Sunday, September 11, 2011

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला.

घर कसे रिकामे रिकामे आणि उदास वाटत होते. गणपती विसर्जन करून आल्यानंतर बाप्पासाठी केलेली ती रिकामी मखर, ते सजवले छत जणू काही आम्हाला तोंड वाकडे करून वाकुल्या दाखवीत होती. १० दिवस गणपती बाप्पा घरी राहिला, अगदी परीवारातालाच एक सदस्य असल्याप्रमाणे. १० दिवस घरात कसे अगदी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते त्या गणरायाला आज निरोप देताना अंतकरण भरून आले होते. बाप्पाला तर डोळे भरून पाहू सुद्धा शकलो नव्हतो. गेल्या वर्षी पर्यंत आमचे एकत्र कुटुंबात राहत होतो. त्यामुळे बाप्पा ची प्रत्येक गोष्ट माझ्या नजरेखालून जात होती. बाप्पा ची मखर, साड्यांची सजावट, गौरी पूजनाची व्यवस्था प्रत्येकात माझा सहभाग असायचा. कामावरून आल्यानंतर १६ तास बाप्पा माझ्या नजरे समोर असायचा. या वर्षी सुद्धा हि सर्व जबाबदारी मीच सांभाळली बाप्पाची मखर आणि इतर सजावट सुद्धा मीच केली, बाप्पा घरी आणणे, त्याची यथासांग पूजा हे सर्व मीच केले, पण मन काही भरले नाही. त्याचे कारण म्हणजे जागा कमी पडत असल्याने जून मध्ये मी नवीन ठिकाणी (नर्हेगाव) शिफ्ट झालो. सण मात्र जुन्या घरीच (हिंगणे खुर्द ) साजरे करायचे ठरले होते. पण जुने घर आणि नवीन घर यामध्ये ६ ते ७ किलोमीटर चे अंतर असल्याने आणि सकाळ सकाळी ऑफिसला जायची घाई असल्यामुळे फक्त संध्याकाळीच आरती करण्या च्या निमित्ताने आम्ही हिंगण्यात यायचो, आणि बाप्पाचे दर्शन व्हायचे. माझ्याकडून बाप्पाची सेवा म्हणावी अशी काही घडली नाही. बाप्पाला एक विनंती करावीशी वाटते कि हे विघ्नहर्त्या गजानना, माझ्याकडून काही चुकले असेल तर क्षमा कर, पण तुझ्यापासून मला दूर लोटू नकोस, तुझ्या सेवेपासून मलाच काय कोणालाच वंचित ठेवू नकोस. हीच तुझ्या चरणी प्रार्थना...     गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.......

No comments:

Post a Comment