Tuesday, April 26, 2011

मला आवडलेली, भावलेली कविता....


काही वर्षांपुर्वी बालगंधर्व रंगमंदिरात निसर्गाचित्रांचे प्रदर्शन लागल्याचे समजले, तिथे चित्रांबरोबरच काही लेखकांच्या कविता सुद्धा लावल्या होत्या. त्यातील मला भावलेली एक कविता...........

समुद्र, सुर्यास्त नि वाळु

यांचं नातं मला चांगलच कळलंय...

कारण समुद्राएवढं प्रेम करुन

तु सुर्यास्तासारखी निघुन गेलीस;

मी मात्र तिथेच वाट पहात उभा आहे,

त्या वाळुवर तुझे नाव कोरुन...

लेखक - नाव माहीत नाही.

Monday, April 25, 2011

अचानक......


दिनांक – २४/०४/२०११.
रविवार... सुट्टिचा दिवस, शांतपणे दुपारचा पडलो होतो..उकाड्यामुळे झोप तर काही लागत नव्हती. कुणास ठावुक कशामुळे.... पण उकाडा खुपच वाढला होता. अचानक वादळ सुरु झाले, झाडे हलु लागली, खिडक्यांची तावदाने एकमेकांवर आपटली, विजा चमकु लागल्या, लाईट गेले,अणि बघता बघता धो धो पाउस सुरु झाला. खिडक्या लावुन सुद्धा पावसाचे पाणी घरात येऊ लागले. हवेत थोडा गारवा वाटु लागला आणि असह्य उकाड्याचे रुपांतर सुसह्य थंड गारव्यात झाले. तब्बल तासभर पडलानंतर पाऊस थांबला. सवयीप्रमाणे आम्ही फिरायला बाहेर पडलो. बघतो तर ठिकठिकाणी झाडे पडली होती, लाईटचे पोल तुटुन पडले होते, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते, कुठे कुठे तर वाहतुक विस्कळित झाली होती, पण नुकसान सोडले तर ह्या पावसाने पुणेकरांना ऊकाड्यापासुन थोडा का होईना दिलासा दिला होता... वरुणराजाने तुषारसिंचन करुन पुणेकरांच्या ग्रिष्माच्या झळांपासुन थोडा वेळ का होईना सुटका केली.... त्यामुळे वरुणराजाचे मनापासुन आभार...